टक्कल पडण्याच्या समस्यांवर मिळाला उपचार ? शास्त्रज्ञांचा दावा, ‘या’ औषधाने डोक्यावर पुन्हा येतील केस

पोलीसनामा ऑनलाईन : केस गळती आणि टक्कल पडण्याची समस्या अनेक लोकांना असते, ज्याचा परिणाम आपल्या स्टाईलवर देखील होतो. परंतु थायलंडमधील संशोधकांचा दावा आहे की, आता टक्कल पडण्यावर एक प्रभावी उपचार उपलब्ध आहे. या संशोधकांनी दावा केला की, खारफुटीच्या झाडांच्या अर्काच्या सहाय्याने टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते. या अर्काला Avicequinon C म्हणतात आणि हे केस गळण्यास कारणीभूत हार्मोन्सला प्रतिबंधित करते.

Chulalongkorn विद्यापीठातील काही संशोधकांनी 50 पुरुष आणि स्त्रियांवर या चाचण्या केल्या आहेत. हे सर्व लोक एंड्रोजेनिक अलोपिसीयाने ग्रस्त होते, जी केस गळतीची सर्वात सामान्य समस्या आहे. या उपचारानंतर, केवळ या लोकांमध्ये केस गळतीचे प्रमाण कमी झाले नाही तर त्यांचे केसही खूप मजबूत झाले. संशोधनानुसार, हे टक्कल पडलेल्या लोकांसाठी देखील प्रभावी आहे. या संशोधनाशी संबंधित प्राध्यापकाने सांगितले की, आम्ही लोकांच्या डोक्याच्या प्रत्येक भागाची छायाचित्रे काढली आहेत. याशिवाय हेअर लॉस क्षेत्रासाठी माइक्रोस्कोपचीही मदत घेतली. आम्ही या प्रक्रियेची 4 महिन्यांसाठी पुनरावृत्ती केली. यानंतर, आम्ही या लोकांचे टक्कल पडलेले क्षेत्र तपासले होते आणि केवळ एका महिन्यानंतर, केसांच्या मजबुतीत बरेच सकारात्मक बदल झाले. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस अ‍ॅलर्जी नव्हती.

याबद्दल बोलताना प्राध्यापक वांचाई दिकनामकुल म्हणाले की, खारफुटीचा हा अर्क एव्हिसेंनिया मारिन म्हणून ओळखला जातो. त्यात प्रमुख रासायनिक अ‍ॅसाइक्विनॉन-सी आहे. आम्हाला आढळले की, त्याचे बरेच फायदे आहेत. सर्व प्रथम, हे केस गळण्याचे हार्मोन्स तयार करणारे एंजाइम थांबवते. याशिवाय अशी प्रथिनेही तयार करतात, ज्यामुळे केसांची वाढ व सामर्थ्य वाढते.

या संशोधनाची पुढची पायरी ही जास्तीत जास्त लोकांवर ही चाचणी करणे आहे. जेणेकरुन थायलंडचे अन्न व औषध प्रशासन त्याला मान्यता देऊ शकेल. एका खासगी कंपनीने या संशोधनासाठी पेटंट आधीच विकत घेतले आहे आणि ही कंपनी त्याच्या मदतीने केस गळतीचे उत्पादन तयार करू शकते. असा विश्वास आहे की हे उत्पादन पुढील 6 महिन्यांत बाजारात येऊ शकते.