जेवणाची ऑर्डर पुर्ण न करू शकलेल्या रेस्टॉरंट मालकांना 1500 वर्षाची जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थायलंडमध्ये एका रेस्टॉरंटमधील दोन मालकांना सुमारे १५०० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कारण या लोकांनी जितक्या लोकांना खायला घालण्याची ऑर्डर घेतली होती, ती पूर्ण केली नाही. त्यांनी लोकांकडून ऍडव्हान्स पैसे घेतले आणि त्यांना सेवा देऊ शकले नाही.

थायलंडमध्ये असा कायदा आहे की, कोणालाही २० वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा ठोठावली जात नाही. पण या प्रकरणात कोर्टाने एक अतिशय कठोर निर्णय घेत रेस्टॉरंटच्या मालकांना १५०० वर्षांची शिक्षा सुनावली.

एका वृत्तसंस्थेनुसार, अपिचार्त बोव्होर्नबनचरक आणि प्रपासोर्न बोव्होर्नबनचरक हे लेइमगेट रेस्टॉरंटचे मालक होते. या लोकांनी गेल्या वर्षी एक ऑफर काढली होती की, १० डॉलर म्हणजे ७५९ रुपयांमध्ये १० लोक सीफूड खाऊ शकतात.

ऑर्डर ऑनलाईन द्यावी लागेल आणि पैसे रेस्टॉरंटच्या बँक खात्यात जमा करावे लागतील, असे रेस्टॉरंटने म्हटले होते. सुमारे २० हजार लोकांनी जेवण बुक केले आणि ऍडव्हान्स पैसे जमा केले.

समस्या अशी होती की, रेस्टॉरंट इतक्या लोकांच्या ऑर्डरची पूर्तता करू शकले नाही. त्यानंतर ३५० ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दिली. या लोकांनी २ मिलियन बहत म्हणजे ४९.०४ लाख रुपयांच्या नुकसानीची मागणी केली आहे.

अपिचार्त आणि प्रपासोर्न यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर दोघांनाही फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांवर ७२३ आरोप लावले गेले.

दोघांनाही एकत्र १४४६ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण या दोघांनीही त्यांची चूक मान्य केली, तेव्हा कोर्टाने दोघांची शिक्षा कमी केली. आता दोघांनाही ७२३-७२३ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल.