महावितरणच्या अधिकाऱ्याला 30 हजाराची लाच देणारा खासगी वायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन 27 वीज मीटरची जोडणी करण्यासाठी आणि वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांच्या लाचेचे रक्कम देणाऱ्या खासगी वायरमनला ठाणे अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.8) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. इरफान अब्दुल गफूर पटेल (वय-42 रा. 103 कनिझ अपार्टमेंट, मुंब्रा स्कूलसमोर, अमरुत नगर, मुंब्रा) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या खासगी वायरमन आणि एजंटचे नाव आहे.

इरफान पटेल याच्या विरुद्ध महावितरण कंपनीचे 42 वर्षीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी मंगळवारी (दि.7) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. इरफान पटेल याने तक्रारदार यांना मुंब्रा येथील रिबा इंटरप्रायझेजच्या रेश्मा रेसिडन्सी येथे 27 नवीन विद्युत मिटर बसवण्यासाठी आणि या ठिकाणी चोरून वीज वापरणाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेचे प्रलोभन दाखवले. तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याची तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला 30 हजार रूपयांच्या लाचेचे प्रलोभन दाखवून पैसे देताना इरफान पटेल याला रंगेहाथ पकडले. इरफान पटेल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/