‘कोरोना’मुक्तांच्याा संख्येत ठाणे शहर देशात नंबर 2 ला !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात ठाणे शहरात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 89 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशात रुग्ण बरे होणार्‍या शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी झाला आहे. शहरातील 23 हजारांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली होती.

दाट वस्त्यांमध्ये कोरोना संक्रमण पसरल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यावेळी शहरात दररोज 400 हून अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडू लागली होती. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शुन्य कोव्हीड मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत कोरोना चाचण्या आणि प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढवून रुग्ण आढळणार्‍या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यावर भर दिला.

त्यामुळे जुलै महिन्यापासून शहरात दररोज आढळणार्‍या रुग्णांची संख्या 200 पेक्षाही कमी झाली. याच काळात शहरातील आरोग्य व्यवस्थाही सक्षम झाल्याने करोनामुक्त होणार्‍या रुग्णांचे प्रमाण वाढले असून करोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्याही कमी झाली आहे. 23 हजार रुग्णांपैकी 21 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या केवळ 1800 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्त होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 89 टक्क्यांवर पोहोचले आहे.