Thane News : सायबर गुन्हेगारांचे धाडस वाढले, आता चक्क पोलिसांचे Facebook खाते हॅक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणा-या पोलिसांनाच आता सायबर गुन्हेगारीचा फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात ठाणे शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि शहरातील विविध नामांकित व्यक्तींचे फेसबुक खाते सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचे उघडकीस आले आहे. या माध्यमातून भामटय़ांनी पैसेही उकळल्याचे समोर येत आहे. पोलिसांकडून या प्रकाराला रोखण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात असून अजूनही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही.

गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी आर्थिक लूट करण्याची नवी शक्कल शोधून काढली आहे. एखाद्या व्यक्तीचे फेसबुक वा ट्विटर खाते हॅक करून त्याचे छायाचित्र चोरून संबंधित व्यक्तीच्या फेसबुक मित्रांकडून पैसे मागण्याचा प्रकार सुरू केले आहेत. परिचयातील अथवा मित्र असलेल्या व्यक्तीकडून पैशाची मागणी करणारा संदेश येत असल्याने लोक तो संदेश खरा समजून संदेशावर नमूद बँक खात्यात पैसे पाठवून देतात व नंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे येत आहेत. आता या गुन्हेगारांची मजल पोलिसांचे फेसबुक खाते हॅक करण्यापर्यंत गेली आहे. गेल्या महिनाभरात ठाणे पोलीस दलातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे फेसबुक खाते हॅक करून त्यांच्या फेसबुक मित्रांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला आहे. ठाण्यातील वकील, बँकिंग तसेच उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचेही या गुन्हेगारांनी फेसबुक खाते हॅक केल्याचे प्रकार समोर आले आहे.

काय काळजी घ्याल ?
फेसबुक खाते हॅक होण्याचे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या ‘पासवर्ड’मध्ये चिन्हे, क्रमांक आणि शब्दांचा मिश्रवापर करावा. त्यामुळे पासवर्ड हॅक करणे कठीण जाते. तसेच पासवर्डमध्ये जन्मतारीख, स्वत:चे नाव आदी गोष्टींचा वापर करू नये. कारण सायबर भामटे असे पासवर्ड सहज शोधून काढू शकतात.