धक्कादायक ! भिवंडीत महिलेवर सामूहिक बलात्कार

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिंवडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात असलेल्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन शेजारील पायवाटेने रात्री आपल्या मैत्रिणीकडे कामाची चौकशी करुन घरी परतणाऱ्या 42 वर्षीय महिलेवर चार जणांच्या टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोन भावांचाही समावेश आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माँटी कैलास वरटे (वय-25), विशाल कैलास वरटे (वय-23), कुमार डकू राठोड (वय-25), अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता (वय-28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिला आपल्या घरी जात असताना आरोपींनी तिला गाठले रेल्वे बोगद्याजवळच गवातामध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अत्याचाराचा हा प्रकार 31 जुलै रोजी रात्री घडला. महिलेच्या तक्रारीनंतर शनिवारी मध्यरात्री नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी तात्काळ आरोपींची धरपकड सुरु केली. दोन भावांसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, चारही आरोपी भिवंडी परिसरातच राहतात. आरोपी 23 ते 28 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील दोन भावांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.