ठाण्यात मोठी कारवाई, 43 लाखांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) गेल्या दोन महिन्यांत कोकण विभागात राबवलेल्या ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’ (festival drive) मध्ये मावा, खवा, तेलसह इतर असा एकूण 42 लाख 94 हजार रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच चाचणीसाठी अन्न पदार्थांचे 259 नमुनेही घेतले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सण, उत्सवाच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते. सणामध्ये विविध अन्नपार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अशावेळी अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ (adulteration food) होण्याची शक्यता असते. हे भेसळयुक्त पदार्थ खाल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी दुकाने किंवा उत्पादनाच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करतात. संशयावरुन अन्न पदार्थांचा साठाही जप्त केला जातो. शिवाय, संबंधित दुकान किंवा तेथील परिसर सील करुन उत्पादन किंवा विक्री थांबवण्याची नोटीस बजावली जाते. भेसळीचा प्रकार असल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतात आणि चाचणीसाठी अन्न पदार्थांचे नमुने घेतले जातात.

FDA च्या कोकण विभागाने गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी, म्हणजेच 20 ऑगस्टपासून फेस्टिव्हल ड्राइव्हला सुरुवात करण्यात आली होती. नवरात्रोत्सवापर्यंत चालू असलेल्या या ड्राइव्हमध्ये 462 किलो खावा, मावा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 89 हजार 124 रुपये आहे. एकूण पाच नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. तसेच तेल, तूपासह अन्य असा एकूण 40 लाख 38 हजार 886 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर 64 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. मिठाइचे 36 नमुने घेण्यात आल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी दिली. तसेच इतर पादार्थांचा एक लाख 66 हजार 720 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 154 नमुनेही घेण्यात आले आहेत.

अन्न पदार्थांचे नमुने घेतल्यानंतर ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. मात्र, प्रयोगशाळेत नमुने तपासणीची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने अहवाल मिळण्यास विलंब लागतो. परिणामी संबंधितांवर पुढील कारवाई करता येत नाही. फेस्टिव्हल ड्राइव्हमध्ये दोन महिन्यांत 259 नमुने तापसणीसाठी घेण्यात आले होते. परंतु यापैकी 236 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत.