शिवशाहीवरील मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात

महाड : पोलीसनामा ऑनलाईन – सतत होणारे अपघात तसेच नादुरूस्त बसेस अशा कारणांमुळे शिवशाही ही एसटीची बससेवा अडचणीत आली आहे. या बसेस खासगी चालक चालवत असून त्यांच्यामुळे अनेकदा एसटी प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशीच जीवघेणी घटना ठाणे-गुहागर या शिवशाही बसच्या मद्यधुंद चालकामुळे प्रवाशाच्या जीवावर बेतली होती. मद्यधुंद झालेल्या या बसच्या चालकाला महाडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ठाणे एसटी स्थानकातून सुटलेली ही शिवशाही बस (एमएच ०३/ सीपी ४८०२) चालक अविनाश मोरे दारूच्या नशेत गुहागर कडे घेऊन निघाला होता. मुंबई-गोवा महामार्गावर पेण मधील रामवाडी स्थानक आल्यानंतर बस वाहकाने गाडी या स्थानकात नेण्यास सांगितले असता त्याने गाडी तशीच पुढे दामवटवली. पुढे जाऊन त्याने एका ढाब्यावर बस थांबवून प्रवासी जेवण करून येईपर्यत मोरे याने ढाब्यावर पुन्हा दारू ढोसली. त्यानंतर पुन्हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांसह वाहकही घाबरला होता. वाहकाने व प्रवाशांनी मोरे याला बस हळू चालविण्याची विनंती केली असता मोरेने प्रवाशांचे न ऐकता बस भरधाव वेगाने पळविण्यास सुरुवात केली. गुहागरपर्यत जाईपर्यत प्रवाशांच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन वाहकाने चालक मोरे यास दीड वाजण्याच्या सुमारास बस महाड स्थानकात घेण्यास सांगितली.

त्यानंतर चालक मोरे महाड स्थानकात बस लावून झोपी गेला. ही बाब महाड आगर व्यवस्थापकांना कळल्यानंतर त्यांनी ठाणे-गुहागर शिवशाही बसमधील प्रवाशांना सकाळी ५ वाजता दुसऱ्या बसने पुढील प्रवासास पाठविले. त्यानंतर मद्यधुंद मोरे यास महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिवशाही बस सेवा ही आरामदायी, वातानुकूलित व सुखकर आहे. मात्र, यावरील खाजगी बसचालकामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

भारतातातील मोठे दहा रेल्वे अपघात