Thane : बदलापूरचे जवान सुनिल शिंदे लेहमध्ये शहीद

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तीन महिन्यापूर्वी लेह येथे झालेल्या जोरदार बर्फवृष्टीत बेपत्ता झालेल्या जवान सुनिल नागनाथ शिंदे (वय 39) यांचा मृतदेह दोन दिवसापूर्वी आढळून आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव बदलापुरातील राहत्या घरी आणण्यात आले. या दुर्दैवी घटनेने पत्नी आणि एक मुलगा व एक मुलगी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मूळचे कसबे तडवळे (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवाशी असलेले सुनिल शिंदे हे गेल्या 13 वर्षापासून सैन्याच्या इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची लेह येथे नियुक्ती झाली होती. बर्फाळ भागात लष्कराची वाहने बंद पडल्यानंतर त्यांची दुरुस्ती करून ती सुरू करणे, तसेच बर्फ पडल्यावर अडकलेल्या गाड्या पुढे घेऊन जाण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्या टीमवर होती. जानेवारी महिन्यात लेह येथे झालेल्या जोरदार बर्फवृष्टीनंतर ते संपर्कात नव्हते. दोन दिवसांपुर्वी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव बदलापुरात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात मांजर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांसह, लष्करी अधिकारी, पोलिस, बदलापूर परिसरातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.