Thane : लग्न मंडपात नवरदेवाच्या आईच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वधू-वरासोबत फोटो काढण्यात व्यस्त असताना नवरदेवाच्या आईचे सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सोमवारी (दि. 1) रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोड येथील ब्रम्हांडमधील श्रीजी कॉम्पलेक्समधील रहिवाशी शीतल शर्मा (नाव बदलले आहे) यांच्या मुलाचे 30 नोव्हेंबर रोजी लग्न होते. येथील हॉटेल कोर्टयार्डच्या शेजारी असलेल्या जलसा लॉनमध्ये विवाह समारंभ सुरू होता. रात्री पावणेअकराच्या दरम्यान लग्न मंचावर वधू-वरासोबत फोटो काढण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळींनी गर्दी केली होती. त्याचवेळी काही नातेवाईकांनी वधू -वरासोबतचे फोटो काढण्यासाठी नवरदेवाची आई शीतल यांनाही आग्रह करत मंचावर बोलावले. त्या मंचावर फोटो काढण्यासाठी गेल्या असता, त्यावेळी त्यांनी हातातील दागिन्यांची पर्स एका रिकाम्या खुर्चीवर ठेवली होती. फोटो काढून झाल्यानंतर काही वेळाने त्या पर्स घेण्यासाठी खुर्चीकडे गेल्या असता. त्यावेळी खुर्चीवरील पर्स गायब झाली होती. पर्समध्ये 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 90 हजारांची रोकड आणि दोन मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा ऐवज होता. पर्समधील मोबाईलही नॉट रिचेबल होते. अखेर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नवरदेवाची आई शीतल यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मात्र, या घटनेने पाहुणे मंडळी नाहक संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मंडपातील सीसीटीव्ही फुजेटद्वारे शोध सुरू

लग्न मंडपातील कॅमे-याच्या फुटेज तसेच लग्नातील व्हिडिओ शूटिंग करणा-याकडून घटनास्थळाच्या चित्रणाची माहिती घेऊन चोरट्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. लवकरच चोरट्याला अटक केली जाईल, असा विश्वास कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी व्यक्त केला आहे.