जितेंद्र आव्हाड समर्थकांवर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर 40 वर्षीय सिव्हिल इंजिनीअरला मारहाण केल्याच्या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ठाण्यातील अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अटक करण्यात आलेल्या 5 जणांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनीअरला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी करमुसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप करत आव्हाड यांच्या माणसांनी त्यांच्यासमोर मला मारहाण केल्याचा आरोप केला होता. तसेच पोलीस ठाण्यात फिर्याद देखील केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करून 5 जणांना अटक केली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या माणसांनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली. त्यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी होते, असा आरोप तरुणाने केला. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत मी त्या तरुणाला ओळखत नसल्याचे म्हटलं आहे. तर अभियंता तरुणाला मरहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.