ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना साडेपंधरा हजार सानुग्रह अनुदान

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे यंदा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळते की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असतानाच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी घेतला आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर एकूण १६ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने करवसुली करणे शक्य झाले नव्हते. त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर होऊन पालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. जून महिन्यापासून पालिकेने करवसुलीवर लक्ष दिले असले तरी पालिकेचा कोरोना नियंत्रण कामावरही मोठा खर्च होत आहे. त्यामुळे यंदा पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळते की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनामध्ये बुधवारी एक बैठक पार पडली. त्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. करोनाच्या संकटात केलेल्या कामाची दखल घेत या वेळी मागील वर्षीपेक्षा वाढीव एक हजार रुपये देऊन १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे महापौर विनिता राणे यांनी सांगितले.

मागील वर्षी कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात आला होता. या वेळी करोना संकटामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. शासनाकडून येणारा निधी वेळेवर मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा दिवाळी बोनस मिळतो की नाही अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती.