लाचखोरीचा कळस ! व्हेंटिलेटरच्या निविदा मंजुरीसाठी 15 लाखाच्या लाचेची मागणी; 5 लाखांचा ‘मलिदा’ घेताना ठाणे मनपाचा आरोग्य अधिकारी ACB च्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे जगभरात थैमान घातले आहे. हजारो लोकांना सध्या साधे बेडही मिळत नाही. असंख्य लोकांना व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. अशा वेळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्हेंटिलेटर निविदा मंजुरीसाठी १५ लाखांची मागणी करुन ५ लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

आरोग्य अधिकारी डॉ. राजु केरबा मुरुडकर असे त्याचे नाव आहे. यातील तक्रारदार हे एका कंपनीचे संपर्क अधिकारी आहेत. ठाणे महानगर पालिकेने हेंटिलेटर तसेच इतर वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची निविदा काढली होती. ही निविदा मंजूर करुन देतो, असे सांगून डॉ. राजु मुरुडकर याने तक्रारदाराकडे निविदेच्या एकूण रक्कमेपैकी १० टक्के असे १५ लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पडताळणीत डॉ. मुरुडकर याने पहिला हप्ता म्हणून ५ लाख  रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेआठ वाजता सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारताना डॉ. मुरुडकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

डॉ. मुरुडकर याच्याविरुद्ध लोकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. परंतु, त्याकडे महापालिका आयुक्त व ठाण्यातील शिवसेनेचे नेते यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळेच तो आता मृताच्या टाळुवरील लोणी खाण्याचा प्रकार करीत होता, अशी टिका मनसे आणि भाजपचे नेते करीत आहेत.