Thane News : धक्कादायक ! धावत्या ट्रेनमध्ये प्रियकराचा युवतीवर अत्याचार

ठाणे : पोलिसनामा ओनलाईन – लग्नाचे आमिष दाखवित एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना ठाणे रेल्वे स्थानकात बुधवारी घडली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल झाली असून या मुलाचा रेल्वे पोलीस आता शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील मूळचा रहिवासी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पीडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. मालाडमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अभिनव पुन्हा गोरखपूरमध्ये गेला होता. पीडितेला त्याने लग्नाचे आमिष दाखवले होते. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दिवशी लग्नाची त्याने योजना आखली होती. त्यानुसार १० फेब्रुवारीला पहाटे त्याने पीडितेला गोरखपूरला जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनल येथे बोलविले.यावेळी पीडितेने घरातून दोन लाखांची रोकडही बॅगेत आणली.

ही ट्रेन ठाणे स्थानकात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आली. तेव्हा ती ट्रेनमधील शौचालयात गेली. त्याचवेळी अभिनवदेखील तिच्या पाठोपाठ शौचालयात शिरला. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तो बाहेर आला. तशाच अवस्थेमध्ये तिने अभिनवबरोबर मनमाडपर्यंत प्रवास सुरू ठेवला. तिकीट तपासणीसाने मनमाडमध्ये तिला हटकले, तेव्हा तिला अभिनवने कोणतीच मदत न करता बतावणी करीत तो तिथून निसटला. दरम्यान, तिथूनच पीडितेने आपल्या पालकांशी संपर्क साधून प्रसंगाची माहिती दिली. पालकांनी दंड भरून तिला घरी आणले. नंतर तिने १२ फेब्रुवारी रोजी अभिनवविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात दाखल केली.