Thane News : दारू विक्रीबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हय़ात पुढील सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृह, पीएमपीएल बस, धार्मिक स्थळे, आठवडे बाजार सात दिवसांसाठी बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचा हॉटेल उद्योगावर विपरित परिणाम होत आहे. या निर्बंधांचा निषेध म्हणून हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोशिएशनने ठाणे जिल्ह्यात दारु विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्यापूर्ण होत नाहीत, तो पर्यंत दारुविक्री बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होतेय. हॉटेल मालकांनी रात्री आठनंतरही हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी मागितली आहे.

राज्यात १५ एप्रिलपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात अशी संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याचा त्यामागे उद्देश आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांनाच या काळात विक्रीची मुभा आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर लॉकडाउन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४,३७१ कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्या ठाण्यात ३४ हजार ७१७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे आधीच उद्योगाला फटका बसला आहे. हॉटेल मालकांनी हॉटेल व्यवसायाला दिलासा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे तसेच उत्पादन शुल्कही हप्त्यामध्ये भरण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि अन्य भागात दारु विक्री करु देणार नाही, असे हॉटेल अँड रेस्टॉरन्ट ओनर्स असोशिएशनने म्हटले आहे.