Breaking : शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना उपनेते, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे (66) यांच आज निधन झालं आहे. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज (सोमवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत तरे हे त्रिविक्रमी महापौर होते. त्यांनी 3 वेळा ठाण्याचे महापौरपद तसेच विधान परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे तरे यांच्यावर महिन्याभरापासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र कोळी समाज संघ तसेच आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे (कार्ला) ते अध्यक्ष होते. तरे यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यावर तसेच कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.