विकास दुबेच्या ‘या’ गुंडाला वाटते एन्काउंटरची भीती, कोर्टाकडे केली ‘ही’ मागणी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा युपी पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याच्या साथिदारांनाही एन्काउंटरची भीती वाटू लागली आहे. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या विकास दुबेचा गुंड अरविंद त्रिवेदी याला देखील आता एन्काउंटरची भीती वाटू लागली आहे. ठाणे पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यापूर्वी त्याने कोर्टाला विनंती केली की त्याला रस्ता मार्गाने नाही तर विमानाने उत्तर प्रदेशात घेऊन जावं. कोर्टाने त्याची ही विनंती मान्य केली आहे. आता उत्तर प्रदेश पोलीस त्रिवेदीला विमानाने कानपूरला घेऊन जाणार आहेत.

महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अरविंद त्रिवेदीला अटक केली होती. आज उत्तर प्रदेश एसटीएफ याचा ताबा घेण्यासाठी आली होती. त्यानुसार त्या दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

त्रिवेदी भाजीच्या गाडीतून ठाण्यात पोहचला

युपी पोलिसांनी कंठस्नान घातलेल्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अरविंद दुबे याने भाजीच्या गाडीत बसून ठाण्यात आला. धक्कादायक म्हणजे विकास आणि अरविंद दोघे एकत्रित उज्जैनला पळाले होते मात्र त्यानंतर अरविंदने आपला वेगळा मार्ग निवडत मिळेल त्या गाडीने उलट सुलट प्रवास करत ठाणे गाठले.

असा केला प्रवास

उज्जैन ते राजस्थान, राजस्थानहून पुणे, पुणे ते नाशिक आणि शेवटी भाजीच्या ट्रकमधून त्रिवेदी नाशिकहून ठाण्याला आपल्या नातेवाईकांकडे आला होता. ठाण्याच्या कोलशेत येथे जाधववाडीत अरविंदचे नातेवाईक राहत होते. त्यांच्याकडे तो आला होता. मात्र अरविंद आल्याची माहिती एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना काही तासातच मिळाली. दया नायक यांनी आपल्या पथकाच्या मदतीने सापळा रचून अरविंदला त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीसह अटक केली. अरविंद ठाण्यातून पळून जाण्याच्या तयारी होता. मात्र, त्यापूर्वीच दया नायक यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

अरविंद त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता उत्तर प्रदेश पोलीस या दोघांनाही ताब्यात घेण्याकरता आले होते. त्यापूर्वी दोघांची ठाणे न्यायालयाने 21 जुलैपर्यंत तळोजा जेलमध्ये रवानगी केली होती. उत्तर प्रदेश पोलीस येताच या दोघांना त्यांच्या हवाली केले गेलं आहे. मंगळवारी या दोघांनाही मुंबईतून कानपूरला विमानाने घेऊन जाणार आहेत.