लग्न समारंभातून चोरलेले 42 तोळे सोन्याचे दागिने मध्यप्रदेशातून जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न समारंभातून 19 लाख 3 हजार रुपये किंमतीचे 42 तोळे सोन्याचे दागिने ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून जप्त केले आहेत. चोरट्यांनी एका दहा वर्षाच्या मुलाच्या मदतीने सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरून नेली होती. ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील गुलखेडी गावातून चोरीला गेलेले सर्व दागिने अट्टल चोरट्याच्या घरातून जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी (दि.24) दिली. या गुन्ह्यातील आरोपींचा अद्याप शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

चोरीची घटना 30 नोव्हेंबर 2020 रोजी घोडबंदर येथील ओवळा येथील जलसा लॉनमध्ये घडली होती. अनिता सिंग यांच्या मुलाचा विवाहसोहळा सुरु असताना रात्री दहाच्या सुमारास नवरा नवरी सोबत फोटो काढले जात होते. फोटो काढत असताना अनिता यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग खुर्चीवर ठेवली होती. काही क्षणात चोरट्यांनी दागिन्यांची बॅग चोरून नेली. या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आणि 90 हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी 1 डिसेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनिता यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील गुलखेडी गावातून अट्टल चोरटा बबलू सिसोदिया याचे घर शोधले, बबलूने त्याच्या दोन साथिदारांसह आणि एका दहा वर्षाच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. गुन्ह्यात बबलूचे नाव निष्पन्न होताच पोलिसांनी 20 डिसेंबर रोजी बबलू रहात असलेल्या घरावर अचानक छापा टाकून घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून 19 लाख 500 रुपये किंमतीचे 423 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. मात्र मोबाईल आणि रोख रक्कम सापडली नाही. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईची चाहूल लागताच बबलूसह त्याचे साथिदार फरार झाले. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास डॉ. राठोड यांनी व्यक्त केला.

चोरीसाठी अल्पवयीन मुलाचा वापर
लग्नसमारंभातून सोन्याचे दागिने चोरण्यासाठी या आंतरराज्य टोळीने एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या अल्पवयीन मुलाने सोन्याची बॅग चोरल्यानंतर आधीच तयारीत असलेले हे टोळके एका वाहनातून पळून गेले. पकडले गेले तर अल्पवयीन मुलाचा समावेश असल्यामुळे प्रकरण फारसे पुढे जात नसल्याने याचा गैरफायदा घेतला जात असल्याची बाब समोर आली आहे. गुलखेडी या गावात अनेकजण अशा प्रकारचे चोरटे असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

ही कारवाई कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे, पोलीस हवालदार उदय कोरे, राजेंद्र चौधरी आणि पोलीस नाईक तुषार पाटील यांच्या पथकाने केली.