मध्यरात्री रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर बाळाचा जन्म

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन

केवळ एक रुपयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील वन रुपी क्लिनिकमध्ये शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एका महिलेने मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षभरात ठाणे रेल्वे स्थानकातील पहिली तर मुंबईतील इतर रेल्वे स्थानकातील वन रुपी क्लिनिकमधील ही चौथी प्रसूती असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी दिली.

२२ वर्षीय महिला ही रात्री टिटवाळा ते घाटकोपर असा प्रवास करत होती. दरम्यान ती ठाणे रेल्वे स्थानकावर असताना तिला प्रसूतीवेदना होत असल्याने तिला तातडीने येथील वन रुपी क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले. येथे ड्युटीवर असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि नर्सने तिची प्रसूती यशस्वीपणे केली. सध्या मुंबईतील १२ रेल्वे स्थानकावर ही सेवा देण्यात येत आहे. आणि लवकरच इतर ८ स्टेशनवर ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राहुल घुले यांनी दिली.