दरोड्याच्या तयारीतील टोळी ठाणे ग्रामीणकडून गजाआड

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोन्या चांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईतांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा, दरोड्यासाठीचे साहित्य आणि ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी दिली.

मोहमद युसुफ याकीब शेख (32 वर्षे, रा. नालासोपारा), राजकुमार उर्फ राजन सिपरवायझर गुप्ता (18 वर्षे, मालवणी, मुंबई), टिप्पू नूरअहमद शेख (27 वर्षे, रा. मालवणी, मुंबई), मुक्तार अहमद जमीर अहमद कुरेशी (वय 29 वर्षे, रा. नालासोपारा) आणि छोटू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्वजण दरोडा, घरफोडी यासारख्या गुन्ह्यातील सराईत आहेत.

नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रलोक येथील बाजारपेठ बंद होण्याच्या वेळी तेथील एका सोन्याचांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा, तीन राऊंड, लोखंडी सूरा, पू ड्रायव्हर, लोखंडी पकड, मिरची पावडर, नायलॉन रस्सी अशा प्राणघातक वस्तू मिळून आल्या.

पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी तपास केल्यावर त्यांनी गॅस कटरने बंद दुकानाचे शटर व ग्रील कापून दुकानातील मोबाईल चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर नंतर त्यांच्याकडून नवघर, काशीमीरा, वालीव आणि इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या चोऱ्यांतील ५४, मोबाईल, ६ लॅपटॉप असा एकूण ६ लाख ५० हजार किंमतीचा मुद्देमाल आणि गॅस सिलेंडर, एका छोटा ऑक्सीजन बाटला व गॅस कटर जप्त करण्यात आला आहे. या गुह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक टिकाराम थाटकर हे करीत आहेत.

ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, अपर पोलिस अधिक्षक संजयकुमार पाटील, भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अतूल कुलकर्णी आणि नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक टिकाराम थाटकर, उप निरिक्षक विजय टक्के, पोना भालेराव, चेतनसिंग राजपूत, जितेंद्र निवळे, गिरगावकर, माने व स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोद बडाख, उपनिरिक्षक अभिजीत टेलर, हवालदार अर्जुन जाधव आणि सहकाऱयांनी सदरची कामगिरी पार पाडली.