ठाणे :तीस लाखाची सुपारी देऊन पत्नीनेच केली पतीची हत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

मोबाईलवर चॅटिंग करते म्हणून नवऱ्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने तीस लाखाची सुपारी देऊन पती शंकर गायकवाड (वय-४४) याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीसह सुपारी घेणाऱ्यास अटक केली आहे.

याप्रकरणी मयत शंकरची पत्नी आरोपी आशा गायकवाड, तसेच सुपारी घेणारा आरोपी हिमांशू दुबे या दोघांना अटक केली आहे. मयत शंकर बेपत्ता झाल्याची तक्रार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मयत शंकरची पत्नी आशा हिनेच दिली होती.

अशी घडली घटना

कल्याण पूर्व भागातील तीसगाव परिसरात शंकर गायकवाड (वय-४४) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी आशा गायकवाडने २० मे रोजी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास सुरु केला असता शंकरचा मृतदेह त्याच्याच मालकीच्या नेरळ येथील फार्म हाऊसवर आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी कुटुंबीयांकडे कसून चौकशी केली. यांनतर पत्नी आशा हिच्याकडे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि खाकी दाखवताच पत्नीने गुन्हा कबुल केला. १८ मे रोजी शंकर व त्याची पत्नी देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना शंकर याला गुंगीचे द्रव्य पाजून त्याला नेरळ येथील फार्म हाउसवर नेले. त्याठिकाणी नेऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

पतीच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मयत शंकरची पत्नी आशा हिने पोलिसांना दिली. पतीच्या हत्येसाठी सुपारीच्या ठरलेल्या रकमेपैकी चार लाख रुपये रक्कम दिल्याचेही तपासात उघड झाले आहे. मृताची पत्नी आशा ही मोबाईलवर सतत चॅटिंग करत असल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायची. त्यातूनच आशा हिने शंकरची मारेकऱ्यांना सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबातील दिलेली माहिती खरी की खोटी याचा देखील तपास पोलीस करत आहेत.