CM ठाकरे व PM मोदींचे आभार ! : खासदार संजय काकडे

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – सर्व जगाला सध्या कोरोना महामारीने वेढा दिला आहे. अमेरिका, इटली, स्पेन यासारखे प्रगत देश यापुढे हतबल झालेले असताना आपले राज्य महाराष्ट्र आणि संपूर्ण देश मात्र सचोटीने कोरोनाशी लढा देताना दिसतोय. देशात सर्वप्रथम अतिशय दूरदृष्टीने महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 मार्च ला घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत 25 मार्च रोजी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. आणि यामुळेच आपल्याकडे जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण आभार मानत असल्याचे राज्यसभा खासदार संजय काकडे म्हणाले.

अमेरिकेत सुमारे 32 कोटी लोकसंख्येपैकी 3 लाखाहून अधिक, इटलीमध्ये सुमारे 7 कोटींपैकी 2 लाखाहून अधिक , स्पेनमध्ये सुमारे 5 कोटी लोकसंख्येपैकी 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि भारतात 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असताना सुमारे 4 हजार लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इटली व स्पेनचे पंतप्रधान यांनी योग्य वेळी लॉकडाऊन न केल्यानेच त्या देशांची आरोग्य सुविधा सर्वोत्तम असतानादेखील त्यांच्याकडे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. भारतात मात्र कोरोनाचा संसर्ग वाढला नाही कारण आपण योग्य वेळी लॉकडाऊन केले. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांनी आभार मानले पाहिजेत, असे खासदार संजय काकडे म्हणाले.

देशात 130 कोटीहून अधिक, महाराष्ट्रात 13 कोटी तर, पुणे जिल्ह्यात 1 कोटीहून अधिक लोकसंख्या आहे. आपल्याकडे सरकार व प्रशासनाने सांगितलेले नियम नाही पाळले आणि कोरोनाचा संसर्ग वाढला तर, काय होईल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते. त्यामुळे सर्वांनी घरी थांबावे आणि सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळावेत, अशी सर्वांना नम्र विनंती आहे, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.

आर्थिक मंदीला घाबरू नका
कोरोनामुळे जागतिक मंदी निश्चित आलेली आहे. परंतु, भारत या आर्थिक मंदीतून लवकर बाहेर पडेल असा विश्वास जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रोजगार, उद्योग व व्यापारासंदर्भात एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like