‘त्या’ जाळलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तीन दिवसांपूर्वी अंधारी येथे जाळलेल्या ५० वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे एकाने रात्री घरात शिरुन महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. या घटनेत ही महिला ९५ टक्के भाजली होती. औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात ती मृत्युशी झुंज देत होती. बुधवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

पोलिसांनी संतोष सखाराम मोहिते (वय ४०, रा. अंधारी) यास अटक केली आहे. आरोपी हा नातेवाईकांचा बीअर बार चालवितो. त्याची पत्नी अंगणवाडी चालविते. त्याला मुलगा व मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रविवारी रात्री ११ वाजता घरात एकटी झोपलेली असताना संतोष मोहिते याने घराचा दरवाजा वाजविला. या महिलेने दरवाजा उघडताच तो जबरदस्तीने घरात शिरला. तिने त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता संतोषने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व घरात ठेवलेल्या प्लास्टिक कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यानंतर संतोषने दरवाजाला बाहेरुन कडी लावून तो पळून गेला.

महिलेच्या आरडाओरडा ऐकून घराशेजारी राहणारी त्यांची मुलगी व जावई तसेच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून पाहिले असता ही महिला भाजलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले. त्यानंतर औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात तिला हलविले. ही महिला ९५ टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी सकाळी पोलिसांनी तिचा जबाब नोंदविल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.