‘नाळ’ पाहण्यासाठी ‘त्या’ मुलाने चक्क स्वतःच्याच अपहरणाचा रचला डाव  

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – नागराज मंजुळे अभिनित ‘नाळ’ चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर देखील राज्य करताना दिसत आहे. आई आणि मुलगा यांच्या नात्यावरील या चित्रपटाने आबालवृद्धांना भुरळ घातली आहे. दरम्यान बीड मधल्या एका नाळच्या छोट्या फॅनने चित्रपट पाहण्याकरिता चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांचा कसून तपास
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड येथील सातवीत शिकणाऱ्या मुलाचे नाव धनंजय केंद्रे असे आहे . दरम्यान या मुलाचे शाळेच्या मैदानावरून अपहरण झाल्याची तक्रार अंबाजोगाई शहर पोलिसांकडे आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते यांनी बीड जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी सुरु केली या मुलाचा करून तपास घ्यायला सुरुवात केली. या दरम्यान अंबाजोगाई लातूर मार्गावर रेनापुर फाट्याजवळ तो धनंजय त्याच्या मित्रांसोबत आढळून आला.

नाळ पाहायला जायचंय…
धनंजय याला बऱ्याच दिवसापासून नाळ चित्रपट पाहायला जायचे होते. मात्र त्याचे आई-वडील त्याला विरोध करीत होते. त्यामुळे त्याच्यासोबतच्या  ३-४ मुलांनी एकत्र येऊन धनंजयच्या अपहरणाचा बनाव केला. मंगळवारी सकाळीच तो मित्रांसोबत शाळेच्या मैदानापासून दुचाकीवर लातुरकडे निघाला. पण, तो दुचाकीवर बसून गेला असल्याचे कुणीतरी त्याच्या घरी सांगितले. यावरून मुलाच्या आई-वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या तीन ते चार तासात त्या चित्रपट पहायला  गेलेल्या मुलांना दुचाकीसह अंबाजोगाई येथे आणले. तसेच त्यांना समजावून सांगितल्याचेही पी. आय. सोमनाथ गीते यांनी सांगितले.