‘त्या’ भाजप नगरसेविकेला फ्लेक्स लावणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवाजीनगर येथील महापालिका भवनसमोर कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मोठा फ्लेक्स झळकवणे भाजपच्या नगरसेविकेला महागात पडले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबधित नगरसेविकेविरूद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाने शिवाजीनगर पोलिसांना दिले. या फलकासह येरवडा आणि ढोले रोड क्षेत्रिय अंतर्गतही बेकायदा फ्लेक्स लावणार्‍यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची पत्रे संबधित क्षेत्रिय कार्यालयांनी अनुक्रमे येरवडा आणि बंडगार्डन पोलिसांना दिली आहेत.

पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की सामाजिक कार्यकर्त्या कनिझ सुखरानी यांनी शहरातील बेकायदा फ्लेक्सबाजी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तीन दिवसांपुर्वी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुखरानी यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही शहरात राजकिय कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीररित्या फ्लेक्स लावण्यात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी त्यांनी नुकतेच महापालिकेसमोर भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या आवाढव्य फ्लेक्ससह येरवडा परिसरातील दोन आणि ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणार्‍या रस्त्यावर लावण्यात आलेला एक अशा चार फ्लेक्सचे फोटो न्यायालयात सादर केले. यावर न्यायालयाने फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाने याप्रकरणी नगरसेवक अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाला दिले आहे. तसेच येरवडा क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत लावण्यात आलेल्या दोन फ्लेक्सवर तसेच ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील फ्लेक्सवर ज्या कार्यकत्यार्र्ची छायाचित्र आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र येरवडा आणि ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाकडून अनुक्रमे येरवडा आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.

याचिकेवर निर्णय होण्याची शक्यता
कनिझ सुखरानी यांनी बेकायदा फ्लेक्सबाबत दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (दि.२) पुढील सुनावणी आहे.  यासंदर्भात माहिती देताना विजय दहिभाते यांनी सांगितले, की तीन दिवसांपुर्वी न्यायालयाने सुनावणी दरम्यान, बेकायदा फ्लेक्स लावणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासोबतच यापुर्वी राजकिय पक्षांनी बेकायदा फ्लेक्सबाबत न्यायालयात सादर केलेली प्रतिज्ञापत्रही उपस्थित ठेवण्यास सांगितली आहेत.

जाहिरात