जे 1999 साली झाले नाही तरे 2019 साली साकारले

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचा बाहेरुन पाठिंबा या समझोत्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मध्ये हिरवा कंदील दिला होता. पण, त्यावेळी ते प्रत्यक्षात न येता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी जे घडले नाही ते आता २०१९ मध्ये घडले असून भाजपाच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. फक्त आता भाजपा मोठा भाऊ झाल्याने त्या त्रिकुटातून शिवसेना बाहेर आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसमधील फुट आणि कारगील युद्धातून मिळणारी सहानभुती यामुळे लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणुक घ्यावी हे भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या गळी उतरवले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ६९, राष्ट्रवादी काँग्रेस ७१, शिवसेना ६२, भाजपा ५४ आणि इतर २६ असे आमदार निवडून आले होते. त्यावेळी भाजपा व शिवसेनेला बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेस मुख्यमंत्रीपदावर अडून होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुसंख्य जण युतीबरोबर जाण्यास तयार होते. त्यामुळे केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थापन झाले तरी महाराष्ट्रातील तिढा आतासारखाच सुटत नव्हता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश जणांचा काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध होता. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधण्यात आले होते. अडचण होती ती त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा कसा मिळेल याचा. त्यासाठी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मन वळविले.

गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि शिवसेना बाहेरुन पाठिंबा देणार असे सुत्र ठरविण्यात आले.परंतु, हे ठरविण्यात काहीसा उशीर झाला. काँग्रेसला ही खेळी वेळीच समजल्याने त्यांनी अनेक महत्वाची पदे राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन युतीचा १९९५ चा फार्म्युला वापरला. गृहमंत्रीपदासह अनेक महत्वाची पदे राष्ट्रवादी काँग्रेसला दिली व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले होते. अजित पवार यांचे पक्षातील वर्चस्व वाढू नये, म्हणून त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना डावलून छगन भुजबळ यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद दिले होते. त्यावेळी जे शक्य झाले नाही़ ते अजित पवार यांनी आता शक्य करुन दाखविले आहे. आता अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत हे मात्र आता नक्की सांगता येत नाही.

Visit : Policenama.com