‘ते’ पोलिस निरीक्षक पुन्हा ‘वादात’, तडजोडीनंतर वाळूचे वाहन सोडले, SP कडे रेकॉर्डिंगसह लेखी तक्रार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूची बेकायदा वाहतूक करणारे वाहन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तडजोड करून सोडून दिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा लेखी तक्रार अर्ज सचिन दशरथ गोरे (रा. नगर) यांनी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे दाखल केला आहे. या तक्रार अर्जासोबत मोबाईल रेकॉर्डिंगही देण्यात आले आहे. यापूर्वी याच पोलीस निरीक्षकाविरुद्ध खंडणी मागितल्याची लेखी तक्रार करण्यात आले होती. त्यानंतर पुन्हा तक्रार दाखल झाल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Ahemadnagar Police

याबाबत गोरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने 15 ऑगस्ट 2019 रोजी रात्री नऊ वाजता भाळवणी ते जामणगाव रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहन पकडले होते. तडजोड करून हे वाहन सोडून देण्यात आले. पोलिसांनी पकडलेले वाहन पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून तडजोड करून सोडून देण्यात आले. हा प्रकार पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक पोवार व इतर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी.’

पोलीस अधीक्षक कार्यालयातही बुधवारी ही लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही पोवार यांच्याविरोधात एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पोवार यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही, तर उपोषणाचा इशाराही दिला होता. ही घटना ताजी असतानाच पोवार यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. त्यांनी तडजोड करून वाळू वाहन सोडल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Visit – policenama.com