आजींबद्दल सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, शेअर केला जुना फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांच्याबद्दल आठवणींना उजाळा देत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावुक अशी पोस्ट केली आहे.

आपल्या आजी शारदाबाई पवार यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितलं की, ‘माझी आजी शारदाबाई पवार आम्हा सर्वांना सोडून गेली त्याला आज ४५ वर्षे झाली. मला ती आजही आठवते, मी सहा तर अभिजीत ४ वर्षांचे असताना विजू अक्का आम्हा दोघांना तिच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या. ज्यावेळी त्यांची भेट झाली होती, तेव्हा आम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर खुललेलं हसू आजही आठवतं. ती आमची शेवटची भेट’ असं सांगून सुप्रिया सुळे आपल्या भावना व्यक्त केल्या.

शारदाबाई पवार या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या होत्या. १९३८ साली शारदाबाई ‘जिल्हा लोकल बोर्डा’च्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. तसेच सलग १४ वर्षे त्यांनी ‘लोकल बोर्ड’ गाजवलं. शरद पवार यांना राजकारणाचे बाळकडू हे त्यांच्या आईकडून मिळत असे. ते आपल्या आईला ‘अहो बाई’ असे संबोधत असत. शरद पवारांचे राजकारण जरी काँग्रेसमधून सुरु झालं असलं तरी त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार या मात्र, शेकापमध्ये होत्या.