‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीने नाकारलं होतं ‘मुख्यमंत्री, पद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निकालानंतर लाबलेल्या सत्तासंघर्षात अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सत्तास्थापनेपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याच्या नाराजीतून अजित पवारांनी भाजपसोबत जाणे पसंत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीने आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपद का नाकरले याचे स्पष्टीकरण एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दिले.

युती सरकार 2014 मध्ये येण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. 15 वर्षे आघाडीने राज्यातील कारभार पाहिला. या कालावधीत राष्ट्रवादीला विधानसभेत काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला त्यावेळी आघाडीत ठरला होता. असे असताना देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारले. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारून मंत्रीमंडळात अधिक खाती वाढवून घेतली. राज्यात पक्ष विस्ताराचा उद्देश होता, त्यामुळे मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य होते. तशी तयारी शिवसेनेने दाखवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार देत उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले. त्यामुळे आताही शरद पवार पक्ष विस्ताराचा विचार करत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह सर्वाधीक 16 मंत्रीपद मिळणार आहेत तर शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहेत.

Visit : policenama.com