‘या’ कारणामुळं आम्ही ‘कमळ’ चिन्हावर लढतोय, रामदास आठवलेंचा मोठा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – महायुतीमध्ये आम्हाला भाजपा केवळ ५ जागा सोडला, आम्ही नाराज असलो तरी त्याचा उपयोग नाही़  ५ जागांवर निवडणुक आयोगाची पक्षाला मान्यता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमचे लोक निवडून आणण्यासाठी आम्ही कमळ हाती घेतले आहे. ते कमळावर निवडून आले तरी ते रिपब्लिकन पक्षाचे आमदार राहणार आहेत, त्यांचा वेगळा गट असेल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीत रिपाईला फक्त ५ जागा मिळाल्या असून तेही कमळ या चिन्हावर निवडणुक लढवत आहे. याविषयी पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले, यापूर्वी आम्ही १९९२ मध्ये मुंबई महापालिकेत असा प्रयोग केला होता. पुणे महापालिकेतही रिपाईचे ५ जण कमळावर निवडून आले तरी त्यांना स्वतंत्र ऑफिस दिले आहे. विधानसभेतही आमचा वेगळा गट राहिल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

केंद्रात कॅबिनेट मिळविण्याबाबत सीएमनी चेंडू टाकला माझ्याच गळ्यात
केंद्र सरकारमध्ये मला राज्यमंत्रीपद मिळाले आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो, असे सांगून आठवले म्हणाले की, मी त्यांना तुम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलून प्रयत्न करावा असे सांगितले. त्यावर त्यांनी तुमचे मोदींशी चांगले संबंध आहेत. तुम्हीच बोला असे सांगत ते माझ्यावर सोपविले असल्याचे आठवले यांनी सांगितले.

राज्यात आम्ही रिपाईला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्रीपद मागितले आहे. याशिवाय २ विधानपरिषदेच्या जागा भाजपाच्या  कोट्यातून तसेच ३ महामंडळावर रिपाई सदस्यांना देण्याची मागणी केली आहे. मुंबईतील शिवाजीनगरची जागा शिवसेनेने रिपाईला न सोडल्याने त्या बदल्यात एक महामंडळा शिवसेनेच्या कोठ्यातून मिळावी असा आमचा प्रस्ताव आहे. याशिवाय १०० ते १५० सदस्यांना विविध मंडळात सामावून घेण्याची मागणी आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बापट आमचे पालकमंत्री
या पत्रकार परिषदेला गिरीश बापट उपस्थित होते. त्याबाबत रामदास आठवले म्हणाले, गिरीश बापट हे आमचे पालकमंत्री आहेत. ते सबुरीने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात. समनजस्याची भूमिका घेऊन सर्वांना बरोबर घेऊन जातात. त्यांनी पुण्यात आमच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर घेतले. ते ब्राम्हण असले तरी आम्ही त्यांना ब्राम्हण मानत नाही. ते आमचे कार्यकर्तेच वाटतात, असे आठवले म्हणाले.