हेलिकॉप्टरवर दगडफेक करणाऱ्या त्या २८ जणांची दहा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन- २००९ साली शिवनेरी गडावर मराठा आरक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टर समजुन दगडफेक केल्याप्रकऱणी संभाजी ब्रिगेडच्या २८ आंदोलकांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

शांताराम कुंजीर, राहुल दत्तात्रय पाटील, विलास कुंजीर, जयदीप किल्लेदार, संतोष किल्लेदार, प्रवीण चौगुले, राहुल रंगनाथ पाटील, महेश चव्हाण, निशांत किल्लेदार, दत्तात्रय गोरडे,सोमेश्वर आहेर, गोरक्ष दळवी, कृष्णांत पवार, संतोष गव्हाणे, ज्योतिबा नरवडे, सुभाष भगत, रमेश मोरे, रमेश खेडेकर, अमोल चव्हाण, विजय वरखेडे, राजू चन्नाळे, मनोज देशमुख,मदन रसाळ, अरविंद मोळक, संजय सुरवसे, राजेश मोरे, भैरू डोंगरे, राजेंद्र पाटील अशी आंदोलकांची नावे आहेत.

१९ फेब्रुवारी २००९ ला मराठा आरक्षणाची ठिणगी किल्ले शिवनेरी गडावर पेटली होती. दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री व इतर मंत्री येणार होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्र्यांऐवजी तत्कालीन मंत्री दिलीप वळसे पाटील आणि बबनराव पाचपुते हेलीकॉप्टरने येत होते. हेलीकॉप्टर शिवनेरी किल्ल्यावर उतरण्यासाठी घिरट्या घालत असताना अचानक कार्यकर्त्यांनी घोषणा देत हेलीकॉप्टरवर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरविले होते.

याप्रकऱणी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या एकूण २८ कार्यकर्त्यांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याचा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. सहजिल्हा न्यायाधीश ए.एस.सलगर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरु होती. अनेक वरिष्ठ आधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयाने नोंदवली होती. मात्र सबळ पुराव्यांअभावी सर्व २८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.