तरूणीच्या अंत्यदर्शनाला गेलेल्या 45 जणांना केलं ‘क्वारंटाईन’

पोलिसनामा ऑलनाईन टीम – कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेल्या तरुणीच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला गेल्यामुळे 45 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. वर्ध्याच्या दहेगाव (स्टेशन) इथल्या एका तरुणीला दीर्घ आजारामुळे औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या देखभालीसाठी परिवारातील सदस्यही होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परवानगी घेऊन तिचे पार्थिव गावात अंत्यसंस्कारासाठी आणले होते.

त्यापूर्वी सोबत असलेल्याची आरोग्य तपासणीही केल्या गेली. ग्रामपंचायत आणि प्रशासनानं त्यांना पार्थिव सरळ स्मशानभूमीत नेण्यास सांगून तशी तयारीही केली होती. पण नातेवाईकांनी पार्थिव घरी नेल्यामुळे जवळपासचे अनेकजण अंत्यदर्शनाला आले होते. त्यांची यादीच आरोग्य विभागान तयार केली आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दहेगाव (स्टेशन) आणि दहेगाव (गावंडे) अशा दोन गाव मिळून तब्बल 45 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तरुणीचा मृत्यू ज्या रुग्णालयात झाला ते औरंगाबाद जिल्हा कोरोनाबाधित आहे. तरुणीचा मृत्यूनंतरचा प्रवासही कोरोनाबाधित जिल्ह्यातून झाला. त्यामुळे पार्थिव आणि त्यांच्यासोबत आलेल्यांशी संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.