Coronavirus : ‘या’ 6 गोष्टींपासून सर्वाधिक पसरतो ‘कोरोना’, सावधगिरी बाळगा

पोलीसनामा ऑनलाईन : घरी असो किंवा बाहेर, कोरोना विषाणूपासून कोणीही पूर्णपणे सुरक्षित नाही. एका नवीन अभ्यासात कोरोना विषाणू एका पृष्ठभागापासून दुसऱ्या पृष्ठभागावर किती सहज आणि वेगाने पसरत आहे याचे वर्णन केले आहे. हा अभ्यास ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केला आहे. चिंतेची बाब अशी आहे की हे पृष्ठभाग असे आहेत ज्यांचा वापर आपल्या सामान्य दिनक्रमात नेहमी होतो. जाणून घेऊया कोणते ते पृष्ठभाग आहेत ज्यांना अभ्यासात सर्वाधिक संसर्गजन्य असे म्हटले आहे.

सार्वजनिक वाहतूक विंडो

मेट्रो आणि बस सारख्या सार्वजनिक परिवहन सेवा सुरू झाल्या आहेत. अभ्यासामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या खिडक्या आणि खांबांना सर्वात संसर्गजन्य म्हणून वर्णन केले आहे. खिडक्या आणि खांब स्टील किंवा काचेसारख्या साहित्याने बनलेले असतात. व्हायरस सहजपणे या पृष्ठभागावर चिकटतात. बरेच प्रवासी चढताना या पृष्ठभागांचा वापर करतात, यामुळे ते अधिक संसर्गजन्य बनतात. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असताना या पृष्ठभागास स्पर्श करणे टाळा.

नोट

अभ्यासानुसार कोरोना विषाणू 20 डिग्री तापमानात 28 दिवसांपर्यंत नोटांवर राहू शकतो. नोटा देवाण-घेवाण दरम्यान व्हायरस पसरण्याचा धोका अधिक असू शकतो. या काळात शक्य तितक्या प्रमाणात प्लास्टिक मनी वापरा. यामुळे आपण व्हायरसच्या संपर्कात येण्यापासून वाचाल.

फोन स्क्रीन

फोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपण जिथे जातो तिथे फोन निश्चितच घेऊन जातो. काही लोक तर वॉशरूममध्ये देखील फोन नेतात. फोनच्या स्क्रीनला व्हायरस सहजपणे चिकटतो. आपली बोटे अधिकतर फोनच्या स्क्रीनवर असतात. म्हणूनच फोनच्या स्क्रीनवरून व्हायरस पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे फोनच्या स्क्रीनला वेळोवेळी सॅनिटाईझ करणे महत्वाचे असते.

रुग्णालयाचा वेटिंगरूम

सध्या तरी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात असली तरीही रुग्णालयाच्या वेटिंग रूममध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. वेटिंग रूममध्ये लोक जास्त संख्येने येत असतात आणि विशेषकरून तेथे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, यामुळे येथे विषाणूचा फैलाव होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी रुग्णालयात चकरा मारणे टाळा. जरी आपल्याला रुग्णालयात जावे लागले तरीही कोणत्याही पृष्ठभागास स्पर्श करणे टाळा आणि मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर आणि ग्लोव्हज वापरा.

एटीएम स्क्रीन आणि बटणे

एटीएमची बटणे, काच आणि स्क्रीनवर विषाणू सहजपणे येऊ शकतात. प्रत्येकजण पैसे काढण्यासाठी एटीएमच्या बटनाला आणि स्क्रीनला स्पर्श करतो. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्याऐवजी ऑनलाईन व्यवहार करा. तुम्हाला एटीएममध्ये जाणे भाग पडल्यास, पैसे काढल्यानंतर ताबडतोब हात सॅनिटाईझ करा आणि घरी येऊन साबणाने आपले हात धुवा.

स्टेनलेस स्टील

अभ्यासानुसार विषाणू जास्त उष्णतेच्या जागी टिकत नाही, परंतु स्टेनलेस स्टीलवर ते सहज तासन्तास राहू शकतात. स्वयंपाकघरात वापरलेली बहुतेक भांडी स्टीलची असतात. यामुळे संसर्गाची शक्यता अधिक वाढते. आपल्या स्वयंपाकघरात असलेली स्टीलची भांडी आणि स्वयंपाकघरातील सर्व पृष्ठभाग नेहमी स्वच्छ ठेवा.

घराच्या आत कोरोनापासून कसे संरक्षण करावे

आपल्या घराची व्यवस्थितपणे साफ-सफाई करा. सर्व पृष्ठभाग स्वच्छ करा. जर आपण कुठून बाहेरून येत असाल तर घरात कशालाही स्पर्श न करता हात चांगले धुवा आणि कपडे बदला. आपल्या घराची व्हेंटिलेशन सिस्टीम योग्य ठेवा. घराच्या खिडक्या खुल्या ठेवा म्हणजे ताजी हवा व सूर्यप्रकाश घराच्या आत पोहोचू शकेल.

You might also like