चक्क कोर्टात ‘त्यानं’ लगावली तरुणीच्या ‘कानशिलात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एक वर्षापूर्वी चालत्या बसमध्ये भावाचा कोयत्याने खून करणाऱ्या आरोपीने कोर्टात साक्षीसाठी आलेल्या तरुणीच्या कानफटात मारली. राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.

अजित भगवान कान्हुरकर (रा. कान्हुरकरमळा, दावडी) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी १२ जून २०१८ रोजी अजित याने श्रीनाथ सुदाम खेसे (वय १८, रा. खेसे वस्ती, दावडी) याचा चालत्या एस टी बसमध्ये कोयत्याने डोक्यात वार करुन खून केला होता. या खटल्याची सुनावणी राजगुरुनगर न्यायालयात सुरु आहे. या खटल्यात साक्ष देण्यासाठी ही तरुणी आली असताना त्याने हा प्रकार केला. या तरुणीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या तरुणीचा अजित हा सख्या आत्याचा मुलगा आहे. हे सर्व जण दावडी गावातच राहतात. गेल्या वर्षी ही घटना घडण्यापूर्वी अजित या आपल्या नात्यातील तरुणीला वारंवार त्रास देत होता. तु माझ्याशी लग्न कर या कारणावरुन तिला दमदाटी करुन तिचा विनयभंग करीत असे. अजित याने या तरुणीला व्हॉटसअ‍ॅपवरुन नातेवाईक व मित्र मैत्रिणी यांना फेसबुकवर व ग्रुपवर अश्लिल फोटो व मेसेज पाठवून बदनामी केली. त्याबाबत बदनामीचा गुन्हा जून २०१८ मध्ये खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही.

ही तरुणी व तिचा भाऊ श्रीनाथ हे १२ जून २०१८ राेजी एस टी बसने राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात जाण्यासाठी राजगुरुनगर डेपोच्या एस टी बसमध्ये खेसे वस्ती येथे बसले. आरोपी अजित हा अगोदरच बसमध्ये बसला होता. एस टी बस १ किलोमीटर अंतरावर गेली असताना अजित पाठीमागील सीटवरुन उठून पुढे आला, तेथे येऊन त्याने पिशवीतून कोयता काढला व भर चालत्या एस टीत त्याच्या डोक्यावर, मानेवर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला होता. यानंतर तो पळून गेला होता. खेड पोलिसांनी त्याला अटक केली असून तेव्हापासून तो तुरुंगात होता. खटल्यासाठी त्याला राजगुरुनगर येथील न्यायालयात आणले असताना त्याने या तरुणीला पोलिसांच्या बंदोबस्तात मारहाण केली.