शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी तडीपार

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईन

शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार आकाश जाधव याला मुंबई आणि ठाणे जल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अल्पवयीन असल्यामुळे कायद्याचा आधार घेत हा गुन्हेगार २०१३ मध्ये झालेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात किरकोळ शिक्षा भोगून बालसुधारगृहातून २०१७ मध्ये बाहेर आला होता. परंतु नंतरही त्याचे वर्तन गुन्हेगारी राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या वेळी आकाश जाधवची १७ वर्षांचा होता. २१ वर्षांचा झाल्यानंतर केवळ दोन महिन्यातच त्याची बालसुधारगृहातून सुटका केली होती. त्याच्यासोबतचे बाकीचे अप्ल्पवयीन गुन्हेगारानाही जुलै २०१४ मध्ये तीन वर्षांची शिक्षा बालन्यायालयाने सुनावली होती. त्यांची रवानगी नाशिक येथील सुधारगृहात केली. बालसुधारगृहात राहून देखील आकाश सुधारला तर नाहीच उलट उलट दंगल करणे, हत्येचा प्रयत्न, हल्ला अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आग्रीपाडा पोलिस ठाणे व एम एन जोशी मार्ग पोलिस ठाणे येथे त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी किरकोळ वादातून त्याने दोन भावांवर हल्ला केला होता.

पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार , जाधवला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात अनेक फौजदारी गुन्हे दाखल असून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची कोणतीही लक्षणे नाहीत असे ते म्हणाले. त्याच्याविरोधात असलेल्या सगळ्या प्रकरणांचा आम्ही अभ्यास केला आणि त्याला तडीपार करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.