व्यापाऱ्यांकडे खंडणी मागणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल 

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुक्यातील वडकी येथील किराणा दुकान व्यावसायिकाला दर महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणीची मागणी करून दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी गणेश दिलीप मोडक याच्यासह सहा जणांवर लोणी काळभोर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भागीरथ रमेशकुमार जांगीड (वय- २९ रा. दत्तनगर, वडकी ता. हवेली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीरथ जांगीड यांचे वडकी गावाच्या हद्दीत ममता ट्रेडिंग कंपनी नावाने किराणा मालाचे दुकान आहे. गणेश मोडक हा १५ दिवसापूर्वी दुकानात येऊन धमकी देऊ लागला की, तुम्ही जर मला महिन्याला पाच हजार रुपये दिले नाहीत तर दुकान बंद करून टाकीन, पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ व दमदाटी करून तेथून निघून गेला होता.
मात्र सोमवारी (ता. ९) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधून पाच अनोळखी व्यक्ती दुकानाबाहेर येऊन उभ्या राहिल्या व अचानकपणे दुकानावरती दगडफेक करून दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तोडफोड करीत असताना म्हणाले की, जर मोडक याला हफ्ता नाही मिळाला तर अशाच पद्धतीने पुढेही तोडफोड करण्यात येईल असे म्हणत तेथून पळ काढला.
यावेळी भागीरथ जांगीड यांनी घडलेली गोष्ट त्यांच्या मित्रांना कळवली असता वडकीतील व्यावसायिक चुनाराम मानारामजी चौधरी, पोखाराम पुनराम चौधरी, अईधानराम पुराराम चौधरी, महेंद्रसिंग मोहनलाल राठोड, कैलास गंगाराम चौधरी, ( सर्व रा. उरुळी देवाची,ता. हवेली) यांनाही यापूर्वी खंडणी तोडफोड व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गणेश दिलीप मोडक याच्यासह सहा जणांवर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.