हेल्मेटसक्तीसाठी आरटीओची सोमवारपासून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्तीची घोषणा पुणे पोलीस आयुक्तांनी केल्याने त्याला विरोध करण्यासाठी हेल्मेटविरोधी गट सक्रीय झाला आहे. असे असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईत हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासासठी आणि वाहन चालकांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी अनेक उपाय योजना आखल्या जातात. याचा एक भाग म्हणून पोलिसांनी १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला विरोध केला जात असतानाच आरटीओने सोमवार (दि.२६) पासून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला आहे. याअनुषंगाने या समितीने दिलेल्या सुचनांनुसार केलेल्या कारवाईचा आढावा गुरूवारी (दि.२२) राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, वाहतुक पोलिस उपायुक्त, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. हेल्मेटसह वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºयांची तपासणी मोहिम राबवून दोषी चालकांविरूध्द कडक कारवाई करण्याचे तसेच वाहन अटकावून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पोलिसांनी दि.१जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार हेल्मेटसह सर्वच वाहतुक नियमांबाबत सोमवारपासून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासूनच वाहतुक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली जाईल. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच मागे बसलेल्या व्यक्तीसाठी संपुर्ण राज्यभर लागू असतील.याआधी केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. यापुढे हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड आकारून परवाना निलंबित करण्यात येईल. वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार असल्याचे आजरी यांनी सांगितले.

हेल्मेट व सीट बेल्ट विषयक नियमांचा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला सुरूवातील दंड आकारून परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतर तडजोड शुल्क वसुल करण्यापुर्वी संबंधित नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस कमीतकमी दोन तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशासाठी उपस्थित राहावे लागेल. या समुपेदशनाला उपस्थित असल्याचा पुरावा दाखविल्यानंतरच परवाना परत दिला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पष्ट केले.