‘ही’ अभिनेत्री करणार नगरमधील आंदोलनाचे नेतृत्व

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – मागील लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद या पुन्हा आता नगरच्या राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत. नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे साकळाई पाणी योजनेसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साकळाई पाणी योजनेच्या बैठकीचे आंदोलकांच्यावतीने दीपाली सय्यद या नेतृत्व करणार आहेत.

सय्यद म्हणाल्या की, साकळाई पाणी योजना ही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या हक्काची योजना आहे. पाण्यासाठी या सरकारकडे भीक मागायची वेळ येते ही शोकांतिका आहे. या योजनेसाठी काही गरज पडल्यास मी स्वतः मदत करेल.

नगर दक्षिणचे भाजपचे खासदार दिलीप गांधी तसेच काँग्रेस युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी साकळाई योजनेचे पाणी आणून द्यावे, यासाठी राज्यस्तरावर मंत्रालयामध्ये आवाज उठवावा. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. त्यांनी असे केले नाही तर त्यांना मतदानाच्या वेळेस गावात फिरकूही देऊ नका. तसेच मतदानावर बहिष्कार घाला, असे त्यांनी सांगितले. सुजय विखे यांनी ८ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू असे सांगितले, तर खासदार गांधी यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडविण्याचे आश्वासन दिले आहे.

साकळाई योजनेवरून या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी लोकप्रतिनिधींसह कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज शेंडे, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, शिवसेनेचे नेते घनश्याम शेलार, पुरुषोत्तम लगड, संदेश कारले आदी साकळाई उपसा जलसिंचन योजना समितीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.