पुण्यातील कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण संघाचा पाठिंबा नाही, प्रवक्ते आनंद दवे निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रकांत पाटील आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शनिवारी पुण्यामध्ये झालेल्या बैठकी नंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासांघाने त्यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र आज ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांना दिशाभूल केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शनिवारी ब्राह्मण महासंघाकडून निवडणुकीतून माघार घेत चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. सायंकाळी ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी पत्रक काढून कोथरुड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण संघाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यानंतर ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी आणि भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यातील चर्चेनंतर कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातून माघार घ्यावी अशी मागणी केली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अद्वैत देहेडराय यांनी पत्रक प्रसिद्ध करून चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेली चर्चा समाधानकारक झाली नसल्याचे म्हटले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष तेथून निघून गेल्यानंतर संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणारे पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकात लिहण्यात आलेला मजकूर पूर्वनियोजित असून या पत्रकाचा ब्राह्मण महासंघाचा काहीही संबंध नाही. आनंद दवे यांना बेजबाबदार कृत्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात असल्याचे पत्रक देहेडराय यांनी प्रसिद्ध केले आहे.

Visit : Policenama.com