निगडी : चिखलीत दोन कामगारांवर हल्ला करुन लुटणा-या तिघांना अटक

निगडी : पोलीसनामा ऑनलाईन

डोक्यात कोयत्याने वार करुन कंपनीतील कामगाराला लुटणा-या दोघांना निगडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. ही घटना गुरुवारी (दि.१४) रात्री साडेबाराच्या सुमारास जाधववाडी चिखली येथील एलाईट पोलीमार्क गोडाऊनच्या बाजुला घडला.

सचिन मल्लीनाथ सुतार (वय-२१, रा. आंबेडकर चौक, चिंचवड) ऋषीकेश उत्तम लोंढे (वय-२१ रा. अजंठानगर, निगडी), ऋतीक अशोक कुसाळकर (रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुकेश सेन (वय-२३ रा. जाधववाडी चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश सेन हे जाधववाडी चिखली येथील एलाईट पोलीमार्क गोडाऊनमध्ये काम करतात. गुरुवारी रात्री मुकेश सेन आणि त्यांचा साथिदार राजेंद्र चिंतान प्रसाद हे दोघे गोडाऊनमध्ये काम करत होते. त्यावेळी अचानक एका फेजची लाईट गेली. फेजची पाहणी करण्यासाठी गोडाऊनच्या बाजुला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ गेले. डीपीच्या तारा पाहत असताना त्या ठिकाणी तीन इसम दुचाकीवरुन त्यांच्या जवळ आले. त्यांनी मुकेश सेन आणि राजेंद्र प्रसाद यांच्या डोक्यात कोयत्याने वार केरुन नऊ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन पळून जात होते. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी चोरांट्यांचा पाठलाग करुन तिघांना रंगेहाथ पकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एम. भोये करीत आहेत.