‘सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले’

आता सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले. तरी आता सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार असं वक्तव्य करत सभा नाकारल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या रॅलीचे फोटो त्यांनी ट्विट केले आहे.

बीड जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली. दरम्यान, त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मात्र रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह अनेकांनी सहभाग नोंदवला. याचे फोटो धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहेत. शिवाय पोलीसांनी सभा नाकारल्यानंतर मुंडेंनी त्याचा निषेधही केला.

‘सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार’

आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात की, “सत्ताधारी सभा नाकारू शकतात पण सामान्य माणसाचा आवाज दाबू शकत नाहीत. परिवर्तन होणार, त्याचा हा प्रचंड जनसमुदाय साक्षीदार आहे. सभा झाली असती तर ती रेकॉर्ड ब्रेक ठरली असती. सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले. तरी आता सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार.D

‘हे भव्य जनमत विजयाची साक्ष आहे’

बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत कार्यकर्ते आणि सामान्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती पाहून बजरंग सोनवणे हे विजयी होतील असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. याबाबत आणखी एक ट्विट त्यांनी केले आहे. त्यात धनंजय मुंडे म्हणतात की, “बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या रॅलीत उपस्थित असलेले हे भव्य जनमत विजयाची साक्ष आहे. ‘बजरंग’बली की जय!”