रिक्षात विसरलेली पावणे २ लाखांचा ऐवज असलेली बॅग केली परत

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – पुण्यात लग्नासाठी आलेल्यांकडून प्रवासात १ लाख ८० हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरली होती. रिक्षाचालक जगदीश अशोककुमार यादव यांनी ती प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल बिबवेवाडी पोलिसांनी रिक्षाचालकाचा गौरव केला.

चंपालाल मालाणी यांच्या नातेवाईकांचे अप्पर बिबवेवाडी येथील महेश सांस्कृतिक भवन येथे १० डिसेंबरला लग्न होते. त्यासाठी ते ९ डिसेंबरला रात्री साडे आठ वाजता शनिवार पेठेतून महेश सांस्कृतिक भवन येथे गेले. यावेळी प्रवास करताना दागिने असलेली बॅग रिक्षातच विसरली. ही बाब त्यांनी अपर पोलीस चौकीतील सहायक पोलीस फौजदार भारुड यांना सांगितले. बॅगेत ६ तोळ्याचे दागिने व नवीन कपडे असा १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज असल्याचे सांगितले. त्यांनी अप्पर मार्शल कोठावळे व गुजर यांना या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले. मालाणी हे प्रवास करत असताना त्यांच्या पाहुण्यांनी रिक्षाचा फोटो काढला होता. तो मिळाल्यावर त्यावरुन ही रिक्षा जगदीश अशोककुमार यादव यांची असल्याचे समजले. त्यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा रिक्षामध्येच त्यांची बॅग आढळून आली. त्यांना बॅगेसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर आणले. तेथे बॅगेची तपासणी केल्यावर त्यातील सर्व दागिने व इतर वस्तू तशाच असल्याचे दिसून आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, उपनिरीक्षक खंडाळे, सहायक पोलीस फौजदार भारुड, पोलीस कर्मचारी कोठावळे, गुजर यांच्या उपस्थितीत चंपालाल मालाणी यांचे नातेवाईक महेश रामगोपाळ कासट यांच्याकडे ही बॅग सुपूर्त करण्यात आली. कासट यांनी रिक्षाचालक व पोलिसांचे आभार मानले.