गुप्तवार्ता विभागातील 3 पोलिस अधिकार्‍यांवर अटकेची टांगती तलवार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राज्य गुप्तवार्ता विभागातील विजय बनसोडे, रवींद्र साळवी, प्रशांत लांगी या तीन पोलीस अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या हातामध्ये बेड्या पडण्याची शक्यता आहे.

सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आता राज्य गुप्तवार्ता विभागातील सहायक पोलीस अधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कणेरकर यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

गुन्हा दाखल झालेल्या बनसोडे, साळवी आणि लांगी या पोलीस अधिकाऱ्यांनी 9 सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एम. बुक्के यांच्या सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. संतोष पवार यांनी काम पाहिले.

Visit : policenama.com