बापरे…..नाचताना बॅन्जो बंद केला म्हणून मारलं

अहमदनगरः पोलीसनामा आॅनलाईन

लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर नाचत असताना बॅंन्जो बंद केला म्हणून दोघा तरुणांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील शेंडी शिवारातील शितळादेवी मंदिर परिसरात  बुधवारी (दि. 30 मे) घडला आहे. या प्रकरणी अनुग्रह सोना देठे (वय-20, रा. शेंडी पोखर्डी) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेंडी परिसरात लग्नसोहळ्यानिमित्त सायंकाळी काही तरुण बॅन्जो लावून नाचत होते. यावेळी अनुग्रह देठे याचा पुतण्या जितेंद्र याने बॅन्जो बंद केला. याचा राग येऊन त्याला केतन सुरेश त्रिंबके, बाळू पाटेकर, करण परसराम गुंड, अशय सोपान कराळे, बापू अनिल शिंदे, सागर भाऊसाहेब कराळे, दिनशे उर्फ गोट्या नवनाथ रोडे, बबलू दत्तात्रय गुंड व सिद्धार्थ सुरेश काळे यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. अनुग्रह देठे भांडण सोडविण्यासाठी गेला असता या नऊ जणांनी त्यालाही मारहाण केली. घटनेनंतर देठे याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी शुक्रवारी (दि १ जून) मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी एस.एन.बडे हे करीत आहेत.