आता अस्वलही शिरु लागली सिमेंटच्या जंगलात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघ, बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे आणि त्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. मात्र, चंद्रपूरच्या दाट वस्तीत चक्क एका अस्वलाने शनिवारी दर्शन दिले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

शहराची दाट वस्ती असलेल्या बालाजी वॉर्डात चक्क अस्वल आले होते. एका झुडुपात ते लपून बसले होते. सकाळी ते काही लोकांच्या दृष्टीस पडले. ही बातमी समजल्यावर त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. वन विभागाचे कर्मचारी बालाजी वॉर्डात आले. त्यांनी इंजेक्शन (डॉट) देऊन त्याला बेशुद्ध केले.  त्यानंतर त्याला पकडून नेण्यात आले आहे. बालाजी वॉर्ड हा शहरातील दाट वस्तीचा भाग आहे. त्याला लागून कोठेही जंगल नाही. त्यामुळे हे अस्वल कुठून आले याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.