अबब ! ‘या’ तीन एकरासाठी २ हजार २३८ कोटींची ‘बोली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत जागेला सोन्याहून अधिक भाव असल्याचे बोलले जाते. पण ही म्हणी जुनी झाली असे म्हणायची वेळ आली आहे. कारण वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) तीन एकर क्षेत्राच्या एका भूखंडासाठी जपानच्या सुमिटोमो कंपनीने तब्बल २,२३८ कोटी रुपयांची बोली लावली आहे. या बोलीनुसार, एकरी ७४५ कोटी रुपये असा भाव पडत असून, मुंबईतील भूखंडाची ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक किंमत ठरली आहे. सुमिटोमो समूहाच्या या बोलीमुळे मुंबईतील सुस्त मालमत्ता बाजार ढवळून निघाला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या भूखंडासाठी सुमिटोमोची एकमेव निविदा आम्हाला प्राप्त झाली आहे. या बोलीची प्रक्रिया सध्या आम्ही पार पाडत आहोत.

हा भूखंड जिओ गार्डनला लागून आहे. इतर दोन भूखंडांसह हा भूखंड गेल्या अनेक महिन्यांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. तथापि, त्याला खरेदीदारच मिळत नव्हता. स्थानिक विकासक रोखीच्या समस्येने ग्रस्त असल्यामुळे मुंबईतील मालमत्ता बाजार सध्या सुस्त आहे. खरेदीदार न मिळण्यामागे हे प्रमुख कारण होते.

या भूखंडाची राखीव किंमत ३.४४ लाख रुपये प्रतिचौरसमीटर इतकी ठेवण्यात आलेली होती. मालमत्ता बाजारातील एका जाणकाराने सांगितले की, सुमिटोमो समूहाने या भूखंडासाठी अवाच्यासव्वा किंमत दिली आहे. तथापि, मुंबईतील बीकेसीसारख्या प्रमुख व्यावसायिक परिसरात कंपनीला आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीच त्यांनी इतकी प्रचंड किंमत दिली आहे.

यापूर्वी २०१० मध्ये लोढा समूहाने वडाळा येथील ६.२ एकर भूखंडासाठी ४०५० कोटी रुपये एमएमआरडीएला देऊ केले होते. ही आजपर्यंतची सर्वांत मोठी बोली ठरली होती. लोढा समूहाच्या बोलीनुसार या भूखंडाचा एकरी भाव ६५३ कोटी रुपये निघत होता. तथापि, लोढा समूहाने ही रक्कम एकरकमी देण्यास असमर्थता दर्शविली होती. पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पैसे देऊ, असे समूहाने म्हटले होते.

आरोग्य विषयक वृत्त

खा. नवनीत राणा यांनी संसदेत मांडला कुपोषणाचा प्रश्न

आतापर्यंत ५६ हजार गरजू रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत

ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान

मायग्रेनच्या वेदनांपासून सुटका हवी असेत तर करा ‘हे’ उपाय