ऑटो क्लस्टर मधील प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन 

कचऱ्यापासून वीज निर्मिती, खत निर्मिती,सांडपाण्याचा पुर्नवापर, कचरा विघटनाच्या विविध पध्दती, त्यासाठी उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान हे सारे काही एका छताखाली सामावलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचा रविवारी (दि. 19) समारोप झाला. रविवारच्या सार्वजनिक सुट्टीचे औचित्य साधून शहरवासियांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

[amazon_link asins=’B072M4X3Z5,B01HJGT33W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15699c37-a541-11e8-90bd-dd6baa5843af’]

पिंपरी-चिंचवड महापालिका व युनीट्रॅक सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या 59 नामांकित संस्था सहभागी झाल्या होत्या. कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरुकता वाढवणे आणि नागरिक, व्यावसायिक, मोठ्या सोसायट्या यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुर्नवापर कसा करावा याबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली.

घरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनही करण्यात आले. आपले घर, आपली सोसायटी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील अद्ययावत यंत्र
सामुग्रीबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरवासियांना देण्यात आल्या. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी संस्था, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच बचत गटांच्या सदस्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. रविवारच्या सार्वजनिक सुट्टीमुळे गर्दीने आज उच्चांक गाठला होता.

महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेवक शितल शिंदे, तुषार कामठे, अभिषेक बारणे, केशव घोळवे, नगरसेविका आरती चोंधे, सुनिता तापकीर, निर्मला कुटे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, सहायक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, व्ही.के. बेंडाळे, एम. एम. शिंदे, कुंडलिक दरवडे आदींनी प्रदर्शनाला भेट दिली.

तीन दिवसात सुमारे आठ हजार नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व जाणून घेतले. महापालिकेचा आरोग्य विभाग एमसीसीआयए, एआयएआय, पीसीएसआयए, पीसीएमएसएमई, पीसीसीआयसीएसए, आयपीएमए, आयएफए, आयबीए,
पीएचए, एमेपी, ईसीएस, पीपीसीएमएफ या औद्योगिक व सामाजिक संघटनांनी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.