Coronavirus : वॅक्सीन व्यतिरिक्त केवळ 5 दिवसांत असा बरा होऊ शकतो ‘कोरोना’चा रूग्ण, शास्त्रज्ञांनी केला दावा

बीजिंग : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या घातक साथीला रोखण्यासाठी चीनमधील प्रयोगशाळेत औषधांवर संशोधन सुरु असून, यामुळे लसीशिवाय कोरोना संसर्गावरती मात करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार आधी चीनमध्ये झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण आढल्यानंतर चीनमध्ये ही संख्या वाढत गेली आणि नंतर संपूर्ण जगात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला. यामुळे चीनसह अनेक देशात लस व औषधोपचारांवर संशोधन करण्यात येत आहे. चीनमधील प्रख्यात पेकिंग विद्यापीठात ज्या औषधांच्या चाचण्या करीत आहेत, त्या औषधांमुळे कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचा कालावधी कमी होणार आहे, शिवाय अल्पकालीन रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल, असा संशोधकांचा दावा आहे.

विद्यापीठाच्या ‘बीजिंग अँडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जेनोमिक्स’ या विभागाच्या संचालिका सुनिनी झी म्हणाल्या की, प्राण्यांवरील चाचणीच्या टप्प्यात हे औषध परिणामकारक ठरले आहे. संसर्ग झालेल्या उंदराच्या शरीरात आम्ही निष्क्रियीकरण केलेली प्रतिद्रव्ये सोडली. त्याच्या पाच दिवसांनी संसर्गाचा परिणाम कमी झाल्याचे आढळले. याचाच अर्थ औषधामध्ये प्रभावी उपचार करण्याची क्षमता आहे.

अशी झाली चाचणी

विषाणूंचा संसर्ग झालेल्या पेशी नष्ट करण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीतून निष्क्रियीकरण केलेल्या प्रतिद्रव्याचा वापर या औषधांसाठी केला आहे. ही प्रतिद्रव्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्या ६० रुग्णांच्या रक्तातून वेगळी काढण्यात आली. या प्रतिद्रव्यामुळे रोग बरा होत असून त्याचा कालावधीही कमी झाल्याचे आढळले. या प्रतिद्रव्यावर आमच्या पथकाने दिवस रात्र संशोधन केले आहे. विषाणूशास्त्र किंवा रोगप्रतिकारशास्त्रापेक्षा एकपेशीय जनुके प्रभावी असल्याचे संशोधनात दिसून आले, अशी माहिती सुनिनी झी यांनी दिली.