बापानेच कापलं मुलीचं मुंडकं, मुंडकं घेऊन पोहचला थेट पोलीस ठाण्यात

हरदोई/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचं मुंडकं कापून धडा वेगळं केलं. एवढ्यावर तो थांबला नाही तर मुलीचं कापलेलं मुंडकं घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस ठाण्यात जाऊन त्याने आपण केलेल्या कृत्याची कबूली पोलिसांना दिली. हा प्रकार ऐकताच पोलिस देखील हादरुन गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीला प्रियकरासोबत नकोत्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या बापाने कुऱ्हाडीने मुलीचं मंडकं धडावेगळ केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हरदोईचे पोलीस अधिकारी अनुराग वत्स यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमसंबंधाविषयी आरोपी बापाला माहिती होती. यामुळे तो नाराज होता. सुरुवातीला त्याने मुलीला मारहाण केली अन् नंतर तिचा खून केला. सध्या आरोपीकडे चौकशी सुरु असून आरोपीने मुलीचा गळा कापण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला. मुलीचे मुंडकं धडावेगळ केल्यानंतर बाप मुलींच मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरदाई जिल्ह्यातील मंझिला गावातील सर्वेश नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीला गावातील आदेश नावाच्या मुलासोबत नकोत्या अवस्थेत पाहिलं. त्यावेळी त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवलं. मात्र दुसऱ्या दिवशी पत्नी घरात नसताना त्याने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने कुऱ्हाडीने मुलीच्या मानेवर वार करुन मुंडकं कापलं. यानंतर तो मुलीचं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्या ठिकाणी घटनेची माहिती देऊन पोलिसांसमोर गुन्हा कबुली केला. पोलिसांनी सर्व हकिकत ऐकल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी मुलीचं धड रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.