जन्मदात्या आईने पैशाची मागणी करणार्‍या मुलाची केली हत्या, कसारा घाटात टाकला मृतदेह

कसारा : पोलीसनामा ऑनलाइन  –   दारुसाठी सतत पैशाची मागणी करणार्‍या जन्मदात्या आईनेच दोघांच्या मदतीने आपल्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह कसारा घाटात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी कसारा पोलिसांनी ठाण्यातील चिरागनगर येथे राहणार्‍या मायाबाई रामदास आगळे, मुलगा शिवाजी रामदास आगळे आणि नातेवाईक अमृत बिरारे यांना अटक केली आहे.
सतीश रामदास आगळे (वय २४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायाबाई यांना शिवाजी व सतीश अशी दोन मुले होती. शिवाजी हा एका डेअरीमध्ये मजुरी करत असून सतीश काही कामधंदा करीत नव्हता. तो दररोज दारु पिऊन येऊन शिवीगाळ करीत पैशांची मागणी करीत असे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देत होता. याच्या या त्रासाला कंटाळून मायाबाई व मोठा मुलगा शिवाजी यांनी नातेवाईक अमृत बिरारे याच्या मदतीने एक प्लॅन आखला. ९ जानेवारी रोजी पहाटे सतीश याचे हात पाय बांधून त्याच्यावर वार करुन त्याची हत्या केली़ व मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून गाडीतून कसारा घाटातील दरीत मृतदेह टाकून दिला.

दोन दिवसांनी मायाबाई व मुलगा शिवाजी हे पुन्हा कसारा घाटात आले व त्यांनी सतीशचे कपडे एका कठड्यावर ठेवले. त्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या महामार्ग पोलिसांकडे ते गेले. त्यांनी तेथील अधिकारी अमोल वालझाडे यांना भेटून आमच्या मुलाचा घातपात झालाय़ कपडे घाटात टाकल्याचे फोन आल्याची माहिती दिली. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ही बाब कसारा पोलीस ठाण्याला कळविली. कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीने घाटात आले. त्यांनी पाहणी केली असता घाटात सुमारे १५० फुट खोल एक पोते दिसले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या मदतीने हे पोते दरीतून वर काढले. त्यात सतीश रामदास आगळे याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांनी मायाबाई व शिवाजी यांना पोलीस ठाण्यात आणले.

त्यांच्याकडे चौकशी करीत असताना पोलिसांना त्यांचाच संशय आला. पोलिसांच्या उलट सुलट प्रश्नांनी भांबावून गेलेल्या दोघांना अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा नातेवाईक अमृत बिरारे याला अटक केली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर ४ तासात तो उघडकीस आणण्यात कसारा पोलिसांना यश आले.